पुण्यात विज पडून 19 वर्षीय युवकाचा मृत्यू
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मागील दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. चऱ्होली मध्ये काल सायंकाळी कामावरून घरी परत जात होता.
याच दरम्यान ही घटना घडली आहे. ओंकार ठाकर असं मरण पावलेल्या तरुणाच नाव आहे. पावसादरम्यान होणाऱ्या दुर्घटनांची शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलंय. पावसामध्ये होर्डिंग दुर्घटना, वीज पडणे किंवा अपघात या घटना घडत अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, त्या घडू नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
तीन दिवसांपूर्वी शेतात भुईमुग काढायला गेलेल्या एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये ही घटना घडली. तिन्हेवाडी – कोहिनकर वाडी गावांच्या हद्दीवर असलेल्या शेंडेवस्ती येथील शेतात मंगळवारी 4 जूनला ही घटना घडली. परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या दरम्यान मंगल आरुडे व त्यांच्या दोन जाऊबाई शेतात भुईमुग काढायला आल्या होत्या. त्या घरी जायला निघाल्या. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर त्यांच्यावर वीज कोसळली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगल आरूडे यांच्या दुर्दैवी मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली गेली.
वीज पडू नये म्हणून कोणती काळजी घ्याल?
शेतामध्ये काम करीत असताना वीजेचा कडकडाट होत असेल तर लागलीच सुरक्षित ठिकाण जवळ करा.
शेतातील झाडाचा आडोसा अजिबात घेऊ नका.
शेती जर डोंगराळ भागात असेल तर सुरक्षित ठिकाणीच आडोसा घ्या.
सुरक्षित जाणे शक्य नसेल तर लागलीच दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा व कानावर हात ठेवा.
शेतकऱ्याने लागलीच जमिनीवर उलथे झोपावे किंवा गुडघ्यामध्ये डोके घालून खाली बसावे.
निवाऱ्यासाठी शेतकरी शक्यतो छत्रीचा वापर करतात पण अशा वेळी लोखंडी किंवा धातूच्या वस्तू वापरणे धोक्याचे असते. त्यामुळे विळा, कोयता, चाकू यासारख्या वस्तू दूर ठेवा.
वीज ही विद्युत खांबाला आकर्षित करीत असते. त्यामुळे विजेच्या खांबाखाली थांबण्याची चूक करु नका.
वीजेचा कडकडाट सुरु असताना मोबाईलचा वापर करुच नका.
वाहनावरील प्रवास टाळा.
आजूबाजूच्या लोकांसोबत सुरक्षित अंतर पाळा.