मोहोळ;मंगळवेढा;पंढरपूर; बार्शी येथे शिवसंपर्क अभियान
मोहोळ, मंगळवेढा-पंढरपूर आणि बार्शीत २८ आणि २९ मे रोजी शिव संपर्क अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटनिहाय होणार बैठका आणि मेळावे
खासदार श्रीरंग बारणे आणि मुंबईचे नगरसेवक अनिल कोकीळ करणार मार्गदर्श
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रमुख विरोधक असलेल्या भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानांतर्गत सोलापूर जिल्हयातील
मोहोळ, पंढरपूर – मंगळवेढा आणि बार्शी विधानसभा मतदार संघात बैठक होणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात तीनही मतदार संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर बोलत होते.
शनिवार २८ मे रोजी सकाळी १० वाजता मोहोळ आणि दुपारी २ वाजता मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा अंतर्गत मंगळवेढा येथे होणाऱ्या मेळाव्यास मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे मार्गदर्शन करणार आहेत.तर रविवार २९ मे रोजी बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक अनिल कोकीळ मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्याला माजी मंत्री दिलीप सोपल आणि भाऊसाहेब आंधळकर उपस्थित राहणार आहेत. याच दरम्यान २६ ते २८ मे या कालावधीत नगरसेवक अनिल कोकीळ हे जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेणार आहेत.
या अभियानामध्ये विधानसभा संपर्कप्रमुख, स्थानीय लोकाधिकार समिती मुंबईचे सदस्य आहेत . शेवटच्या शिवसैनिकापर्यंत, शेवटच्या गटप्रमुखापर्यंत, शेवटच्या गावापर्यंत जाऊन संघटना वाढीसाठी या गावांमध्ये काय आवश्यक आहे ? कोणत्या योजना , शासनाने आतापर्यंत घेतलेले निर्णय पोहोचलेत का , कोणी कुठल्या लाभापासून वंचित राहिले आहे का यावर चर्चा होणार आहे. संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिव संपर्क अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने होत आहे. येणाऱ्या २८ आणि २९ तारखेला सोलापूर जिल्ह्यातून शिव संपर्क अभियान फार मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात पदाधिकारी यशस्वी करून दाखवणार आहेत. सर्व शिवसैनिक कामाला लागले असून सर्व पदाधिकाऱ्यांनी फार उत्साह मध्ये येथे नियोजनाचे काम हातात घेतले असल्याचे सांगत शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून होणाऱ्या मेळाव्यास शिवसैनिकांनी ताकद दाखवून द्यावी ,असे आवाहन जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केले आहे.
या बैठकीला मोहोळच्या नगरसेविका सीमाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, तुकाराम भोजने, दादासाहेब पवार, मंगळवेढा तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, बार्शी तालुका प्रमुख प्रवीण काकडे, तालुका समन्वयक वजीर शेख, उपतालुकाप्रमुख संजय पौळ, माजी सभापती पांडुरंग पवार, युवा सेनेचे तालुका समन्वयक प्रसाद निळ, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य देशमुख, विभाग प्रमुख अच्युतराव बाभळे, सदाशिव सलगर ,हुकुमचंद राठोड यांच्यासह ग्रामीण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————–
भाजपचा नायनाट होणार !
————————————–
शिव संपर्क अभियान संघटना बांधणीसाठी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि कुठे कमी तिथं संघटना कशी उभी करायची यासाठी हे अभियान असून येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आमचा प्रमुख विरोधक आहे . भारतीय जनता पार्टीचा नायनाट केल्याशिवाय सोलापूर जिल्ह्यामधील शिवसैनिक राहणार नाहीत. शिवसेनेच्या करंगळीला धरून भाजपवाले महाराष्ट्रात आले. बाळासाहेबांच्या जवळ राहून त्यांनी आपली पाळेमुळे रोवली. आणि आज वेगवेगळ्या पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांनी पक्ष वाढवला. आज मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला वाईट वागणूक दिली आहे. शिवसेनेला संपवायला निघालेले भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने संपवले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा डाव ओळखून त्यांची मैत्री सोडली आणि आयुष्यभर ज्यांच्या विरोधात काम केलं आणि त्यांना सोबत घेऊन आज कठीण परिस्थितीतसुद्धा महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे. येणाऱ्या काळात सुद्धा चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीचे सरकार शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून मुख्यमंत्री त्यासाठी अहोरात्र झटत आहेत,असे शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.
Good for this