शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी ५ लाखाची मागणी करणाऱ्या एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
सोलापूर : शहरातील एका आश्रम शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षिकेचा प्रलंबित पगार ५ लाखाची मागणी करणाऱ्या एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी (ता.26) दुपारी सात रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अटक केली आहे.
यामध्ये सहभागी असलेला दुसरा शिपाई मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. समाज कल्याण विभाग सोलापूर अंतर्गत जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळा येथे शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या किसन मारुती भोसले (वय-५२,रा. वैष्णवी हाईट्स, कर्वेनगर, पुणे) तसेच प्राथमिक आश्रम शाळा बसव नगर मंद्रूप दक्षिण सोलापूर येथे शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या अशोक गेमु जाधव (वय-५२,रा. शिमला नगर, विजापूर रोड) या दोन कर्मचाऱ्यांनी आश्रम शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या तक्रारदार यांच्या शिक्षक पत्नीचे थकीत वेतन अदा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. ही लाच वरिष्ठांच्या नावे विजापूर रोडवरील डॉ.स्वामी यांच्या दवाखान्याच्या समोरील बाजूस असलेल्या हॉटेल सिद्धेश्वर येथे ५ लाख रुपयाची बक्षिस स्वरूपात लाचेची मागणी केली होती.