ससूनच्या डॉक्टरांचा कारनामा रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले अन् मग… पोर्शे प्रकरणात संतापजनक माहिती
ससूनच्या डॉक्टरांचा कारनामा
रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले
अन् मग…
पोर्शे प्रकरणात संतापजनक माहिती
पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेने सकाळी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख
डॉ. अजय तावरे आणि
डॉ. श्रीहरी हळनोर
या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.
या डॉक्टरांनी अल्पवयीनच्या रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात टाकले, त्यानंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचं भासवत अहवाल दिला,
असा आरोप त्यांच्यावर आहे. याविषयी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली. आम्ही हॉस्पिटलमधील संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला आणि हेराफेरी लक्षात आली.
त्यानंतर आमच्या टीमने दोन डॉक्टरांना अटक करण्याचा निर्णय घेतला.
हे दोघेही हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागात नेमणुकीस आहेत, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. अपघात झाल्यानंतर १९ मे २०२४ रोजी ११ वाजता अल्पवयीनच्या रक्ताचे जे नमुने घेण्यात आले होते
ते दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आले होते.
त्यानंतर ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते,
अशी माहिती त्यांनी दिली.
अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले आणि कचऱ्यात टाकले
जो गाडी चालवत होता त्याचे ब्लड सँपल ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतले आणि डस्टबिनमध्ये टाकले.
त्याजागी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घतले आणि त्यावर अल्पवयीन आरोपीचं नाव लिहून हे त्याच्या रक्ताचे नमुने आहेत
असं भासवत ते पुढे टेस्टला पाठवण्यात आले.
फॉरेन्सिक लॅबचे सी.एम.ओ. डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे सगळे ब्लड सँपल घेतले आणि रिप्लेस केले होते.
त्यांना ताब्यात घेतलं,
त्यांची चौकशी केली असता
डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन हे करण्यात आल्याचं समोर आलं आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.
दोन्ही रक्ताचे नमुने वेगवेगळ्या व्य़क्तीचे
कुठलीही शंका राहू नये,
म्हणून रात्री अल्पवयीन आरोपीचं दुसरा ब्लड सँपल औंध येथील रुग्णालयात घेण्यात आलं होतं.
ससूनमध्ये जे ब्लड सँपल गेले ते आरोपीचेच आहे की नाही हे तपासण्यासाठी हे दुसरे सँपल घेण्यात आले होते.
आम्हाला जे रिपोर्ट प्राप्त झाले, त्यानुसार,
औंधला दिलेलं सँपल हे आरोपीचं होतं,
ते त्याच्या वडिलांच्या ब्लड सँपलशी मॅच झालं.
पण, ससूनचं सँपल हे अल्पवयीनचं नव्हतं,
हे स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांना ताब्यात घेऊन चौकशी केली मग त्यांना सकाळी अटक करण्यात आली. आज त्यांना मे. कोर्टासमोर हजर करुन पोलिस कोठडी मागणार,
तसेच ते ब्लड सँपल कोणाचे होते ?
याचाही शोध लावला जाईल.
ससून रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत.
या प्रकणात गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे या अनुशंगाने कलम लावण्यात आले आहेत.डॉक्टरांविरोधात भक्कम, कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे आहे.या प्रकरणात ३ गुन्हे दाखल आहेत. पहिला हा अल्पवयीन आरोपीवर,
दुसरा वडील आणि बार मालक-संचालकावर, तिसरा आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, आता या फसवणूक प्रकरणात डॉक्टरांसोबतच अल्पवयीनचे वडील यांनाही आरोपी करण्यात आलं आहे. कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला होता.
अल्पवयीन आरोपीने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवत या दोघांना चिरडल्याचा आरोप आहे.
सध्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. तर त्याचे वडील आणि आजोबा यांना अटक करण्यात आली आहे.