दक्षिण’मधील वीज,पाणी, आरोग्य आणि रोजगाराचा प्रश्न सोडवू! गावभेट दौर्यात धर्मराज काडादी यांची ग्वाही
दक्षिण’मधील वीज,पाणी, आरोग्य आणि रोजगाराचा प्रश्न सोडवू!
गावभेट दौर्यात धर्मराज काडादी यांची ग्वाही
मंद्रूप प्रतिनिधी सोलापूर, दि.१०-
दहा वर्षांपूर्वी मतदारांनी ज्यांना मोठ्या आशेने निवडून दिले. त्यांनी मतदारसंघाचा विकास करण्याऐवजी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे जनतेचे मूलभूत प्रश्नही सुटले नाहीत. सुडाचे राजकारण करणार्या लोकप्रतिनिधीला पराभूत करण्याची हीच योग्य वेळ आहे मतदार राजांनी आपापल्या एकदा सेवेची संधी दिली तर या मतदारसंघातील शेतीच्या सिंचनाबरोबरच पिण्यासाठी पाणी, वीज, रस्ते आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावून तरूणांना स्वावलंबी बनवू, अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली.
शनिवारी, काडादी यांनी वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, अकोले (मंद्रूप), गुंजेगाव, कंदलगाव, अंत्रोळी आणि निंबर्गी या गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. या दौर्यात ठिकठिकाणी काडादी यांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौर्यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती महादेव पाटील, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पाटील, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील- कुडल
विद्यासागर मुलगे, , राजशेखर पाटील, अॅड. शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, लक्ष्मण झळकी, प्रा. संतोष मेटकरी, शिवशरण दिंडोरे, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी काडादी म्हणाले, या मतदारसंघातील मतदारांनी ज्यांना दहा वर्षे निवडून दिले. त्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विकासाचे राजकारण करण्याऐवजी सहकारी संस्था व सहकारी चळवळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्री असताना त्यांनी सहकारी संस्थांचे बळकटीकरण व सक्षमीकरणासाठी आपल्या पदाचा सदुपयोग करण्याऐवजी त्यांनी सहकारी संस्था बंद पाडण्याचे धोरण अवलंबले. शेतकर्यांसाठी मंदिरासमान असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून राज्याच्या सहकार चळवळीत आदर्श असलेला हा साखर कारखाना बंद पाडण्याचे पाप केले. त्यामुळे याचा राग शेतकरी सभासद आणि समस्त मतदारांमध्ये आहे. शेतकर्यांच्या अन्नामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पराभूत करून आपला राग दाखवून दिला होता. तोच संताप अजूनही कायम असून सिध्देश्वर कारखाना बंद पाडून स्वत:चा खासगी कारखाना चालावा म्हणून हा उद्योग करणार्या भाजपच्या आमदाराला मतदार निश्चितच घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काडादी यांनी व्यक्त केला.
यावेळी राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे यांनी धर्मराज काडादी हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असून दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
……