ब्रेकिंग! भाजप नेत्याच्या हत्येमुळे खळबळ
ऐन निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरला असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीचे मनसेचे माजी जिल्हाप्रमुख आणि भाजपच्या नेत्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
सुधाकर खाडे, असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. शेतीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला अटक केल्याचे समोर येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, खाडे यांनी मिरजेत पंढरपूर रस्त्यावर राम मंदिरालगत चंदनवाले मळा येथे पावणेपाच एकर जमीन विकसनासाठी घेतली होती. पण, यास लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतल्याने गेले काही महिने खाडे यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. या जागेवर कुंपण घालण्यासाठी खाडे काही जणांसोबत तेथे गेले होते. यावेळी चंदनवाले कुटुंबीय आणि खाडे यांच्यात जोरदार वाद झाला. तेव्हा रागातून कार्तिक चंदनवाले याने मागून खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. मानेवर कुऱ्हाडीचा वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला.
या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काही जणांवर गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक चंदनवाले यास पोलिसांनी अटक केली आहे