पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
सांगोला :- पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच पत्नी, तिचा प्रियकर व तिच्या भावाने दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळुन पतीने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयताचा चुलत भाऊ दादासो शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताची पत्नी, आबासो बिरा खरात, दादा ईश्वर धुलगुडे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला तालुक्यातील एका गावातील येथील दत्ता सुखदेव शेळके याचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. १५ दिवसांपूर्वी दत्ता याने भाऊजी व चुलत भाऊ दादासो शेळके यांना भेटून तसेच पत्नीचे गावातील आबासो बिरा खरात नावाच्या युवकासोबत अनैतिक संबंध असून त्या दोघांपासून जिवीतास धोका असल्याचे सांगीतले होते. त्यानंतर अंकुश हांडे (भावजी) यांनी दत्ताच्या समोर त्याच्या पत्नीला समजावुन सांगत असताना माझ्या नवऱ्याने दारू सोडावी, नाहीतर मी माझ्या मनाला वाटेल तसे वागणार असे उत्तर देत ती निघून गेली होती.
पत्नीचे अनैतिक संबंध वाढत चालल्याने गावात उलट-सुलट चर्चा होत असल्यामुळे दत्ता जास्तच दारूच्या आहारी गेला होता. त्यानंतर दादा धुलगुडे तसेच आबासो खरात या दोघांनी अचकदाणी फॉरेस्टमध्ये दत्ताला हाताबुक्क्यांनी मारहाण करून तू तुझ्या पत्नीवर संशय घेवू नकोस नाहीतर आम्ही दोघेजण तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. २३ जुलै रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास चुलते ज्ञानेश्वर आबा शेळके यांनी दादासो शेळके यांना फोन करून दत्ता हा घरात बेशुद्ध आहे, त्याने मान टाकली आहे, तू बघायला ये असे सांगितले. त्यानंतर दत्ता सुखदेव शेळके यास आटपाडी येथील सरकारी दवाखान्यात घेवुन गेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासुन दत्ता उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले.
त्यांनंतर दत्ता यास सांगोला येथील सरकारी दवाखाणन्यात आणले असता डॉक्टरांनी तपासून तो गळफास घेतल्याने मयत झाल्याचे सांगितले. याबाबत मयताचा चुलत भाऊ दादासो मारुती शेळके यांनी मयताची पत्नी, आबासो बिरा खरात, दादा ईश्वर धुलगुडे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.