राज्यात महाविकास आघाडी मजबूत व्हावी यासाठी काम करा.
विधानसभा ॲक्शन प्लॅन तयार: उद्धव ठाकरे
एनडीए सरकारच्या शपथविधीला २४ तास पूर्ण होत नाहीत तोच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख, नवनिर्वाचित खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन करण्यात आले. कोणत्या जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला त्या ठिकाणी आता पक्ष संघटनेसाठी कशाप्रकारे चांगले काम करता येईल, याबाबत चर्चा झाली. तसेच ठाकरे गटाच्या उमेदवारांचा ज्या मतदारसंघात पराभव झाला, तिथला आढावा घेण्यात आला. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे
बिगुल हे पुढच्या चार ते सहा महिन्यात लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता ज्या चुका या निवडणुकीत झाल्या त्या चुका टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात काही जागांवर उमेदवारांची निवड उशिराने झाली. त्यामुळे त्याचे परिणाम त्या-त्या पक्षांना भोगावी लागली.
तसेच निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये योग्य तिढा न सुटल्यामुळे उमेदवाराचा पराभव झाल्याचे बघायला मिळाले.
त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण आधी झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करणार आहेत. उद्धव यांनी याबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव हे त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु करणार आहेत. उद्धव यांच्याकडून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, जागावाटपाची चिंता करु नका. राज्यात महाविकास आघाडी मजबूत व्हावी यासाठी काम करा.