पुणे विद्यापीठात जमावबंदीचा आदेश लागू
-
पुणे विद्यापीठात मागील काही दिवसांपासून दोन विरोधी गटात मोठ्या (Savitribai Phule Pune University) प्रमाणात वादावादी सुरु आहे. यातच हाणामारीच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
-
विद्यापीठ परिसरात 7 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पुणे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यापीठाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा तक्रार पुढे आल्याने सध्या पुणे विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे. यामुळे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले होते. या पत्राची गंभीर दखल पुणे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली असून विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याने विद्यापीठात मागील काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे विद्यापीठात प्रवेशावर बंधनं घालण्यात आली असून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणालाही विद्यापीठ परिसरात प्रवेश मिळणार नाही आहे. या निर्णयामुळे पुणे विद्यापीठात होणारे गोंधळ आणि अनुचित प्रकार कमी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता जमावबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शिक्षणांचं माहेरघर असलेल्या पुण्यात आणि ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 8 नंबरच्या वसतीगृहातील पार्कींगमध्ये काळ्या रंगाने आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे.त्यानंतर विद्यापीठातील वसतीगृहातील संपूर्ण परिसर मोकळा केला आहे. या ठिकाणी कोणालाही जाण्यास आता विद्यापीठ प्रशासनाकडून बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बाहेर भाजप आंदोलन करत होते. या सगळ्यांसंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीन करण्यात येत होती. त्याच दरम्यान डाव्या संघटनेचे कार्यकर्तेदेखील आले. घोषणाबाजी सुरु असतानाच हा राडा झाला होता. दोन्ही गट एकमेकांवर भिडले होते. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.