तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू, पुणे पाण्याखाली
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपले आहे. रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांत पाणी साचले आहे, रस्त्यावरील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत. अशा परिस्थितीतच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना ही घटना घडली. या घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज पहाटे तीन वाजता भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिजखालील अंडा भुर्जी स्टॉल येथे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंडा भुर्जी येथे काम करणारे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता निघाले होते. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. नंतर या तिघांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. येथे डॉक्टरांनी दरम्यान त्यांना मयत घोषित केले. अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25 राहणार पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (वय 21 रा. पुलाची वाडी डेक्कन) आणि शिवा जिदबहादूर परिहार (वय १८ नेपाळी कामगार) अशी या तिघा जणांची नावे आहेत.