उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था ‘फिक्की’ च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित गांधी विजयी
उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था ‘फिक्की’ च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित गांधी विजयी
—————————
‘फिक्की’च्या संचालकपदी सलग तिसऱ्यांदा विजय
—————————
नवी दिल्ली : देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या व ‘फिक्की’ या नावाने ओळखले जात असलेल्या नवी दिल्लीच्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज’च्या कार्यकारी समिती संचालकपदाच्या निवडणुकीत ललित गांधी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. या निवडणुकीत ललित गांधी विक्रमी मतांनी निवडून आले. निवडीचा कालावधी तीन वर्षासाठीचा आहे. फिक्कीचे महासंचालक अरुण चावला यांनी त्यांना नुकतेच निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.सध्या ललित गांधी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अँड अँग्री.’चे अध्यक्ष आहेत. दिल्ली येथे फिक्कीच्या 95 व्या वार्षिक सभेप्रसंगी ही निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत गांधी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन बाजी मारली. त्यामुळे देशातील सर्वोच्च शिखर संस्थेत गांधी यांनी संचालकपदाची हॅटट्रीक पूर्ण केली आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत या गटात उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेले ते एकमेव प्रतिनिधी आहेत.
देशातील विविध उद्योग व व्यापारी घटकांची राष्ट्रीय शिखर संस्था असलेल्या ‘फिक्की’ च्या औद्योगिक संस्था गटातून झालेल्या निवडणूकीत ललित गांधी यांनी हा विजय प्राप्त केला. यापूर्वी दोन वेळा संचालक म्हणून काम करताना अचूक माहिती उद्योग जगताला देत सरकार बरोबर योग्य तो समन्वय करण्याचं महत्वाचं काम केले आहे. ‘फिक्की’सारख्या संस्था उद्योग आणि व्यापार क्षेत्रात, विशेषता शासकीय स्तरावर विविध धोरण ठरवण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावितात. `फिक्की` या संस्थेवर सलग तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा मोठा सन्मान समजत असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले. देशाच्या अर्थविषयक आणि उद्योग विषयक धोरण ठरविण्यात प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या ‘फिक्की’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेतला जाईल, महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम उद्योगांना सुद्धा अधिक बळ देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काम करू असेही त्यांनी सांगितले.